कळंबस्ते येथे तब्बल १२ फूट लांबीची मगर जेरबंद

 

वन विभागाची यशस्वी मोहिम

चिपळूण : वाशिष्ठी नदीचे पुराचे पाणी ओसरल्यानंतर मौजे काळंबस्ते येथे आज (२२ ऑगस्ट) श्री. प्रशांत घोरपडे यांच्या शेतात मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत मगरीला सुरक्षित रेस्क्यू केले. तब्बल १२ फूट लांबीची ही मगर पिंजऱ्यात जेरबंद करून अखेर नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण एस. एस. खान, वनरक्षक रामपूरचे राहुल गुंठे, वनरक्षक फिरते पथकातील दत्ताराम सुर्वे, विशाल पाटील, प्रणित कोळी, वनरक्षक आबलोलीचे कुमार पवार, वाहन चालक नंदकुमार कदम, वॉचमन  संजय अंबोकर, सचिन भैरवकर यांच्यासह सर्पमित्र शिवराज शिर्के, प्रणित काळकुटकी, प्रथमेश पवार आणि सुरेंद्र भोंडवे हे सर्वजण पिंजऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी समन्वय साधून रेस्क्यू मोहिम राबवली.

या मोहिमेचे मार्गदर्शन विभागीय वन अधिकारी, चिपळूण सौ. गिरिजा देसाई आणि सहाय्यक वन संरक्षक सौ. प्रियांका लगड यांनी केले. त्यांच्या देखरेखीखाली आणि प्रत्यक्ष परिक्षेत्र अधिकारी श्री. एस. एस. खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. १२ फूट लांबीची मगर सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला आहे. वन विभाग व सर्पमित्रांच्या तत्परतेबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, विभागाचे कौतुक केले जात आहे.