१५ दिवसांत तिसरा अपघात, ग्रामस्थ भयभीत
रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील एकाच धोकादायक वळणावर आज सकाळी पुन्हा एक ट्रक दरीत कोसळला. गुगल मॅपच्या साह्याने मार्गक्रमण करत असलेल्या या ट्रकला या अवघड वळणावर अपघाताचा सामना करावा लागला. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा अपघात असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे आणि स्थानिक ग्रामस्थ दहशतीत आहेत. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळी १० वाजताच्या सुमारास गोव्याहून वसईकडे पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन जाणारा एमएच ४८ जीबी २९३० क्रमांकाचा ट्रक गुगल मॅपच्या निर्देशांनुसार फुणगुस मार्गे प्रवास करत होता. फुणगुस गावाजवळील एका अत्यंत अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि सुमारे ७ टन मालवाहू ट्रक थेट ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकवरून उडी मारल्याने तो बचावला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थ किरण भोसले, साहीम खान, प्रशांत थुळ, सुभाष लांजेकर, जमीर नाईक यांच्यासह इतर ग्रामस्थांनी दरीत उतरून चालकाला सुखरूप वर काढले आणि त्याला पाणी दिले.
यापूर्वी, अवघ्या दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका केमिकल टँकरचा अपघात झाला होता, त्यावेळीही ग्रामस्थ किरण भोसले आणि साहिल खान यांनी अथक प्रयत्न करून मदतकार्य केले होते. विशेष म्हणजे, गेल्या पंधरा दिवसांतील या तिसऱ्या अपघातामुळे या वळणाची भयावहता अधिकच वाढली आहे. गुगल मॅपसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही या रस्त्यावरील धोके कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिक पोलीस पाटलांनी घटनेची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्याला दिली असून, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे फुणगुस येथील ग्रामस्थ मोठ्या चिंतेत असून, प्रशासनाने या धोकादायक वळणावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, तसेच अशा धोकादायक मार्गांची माहिती गुगल मॅपसारख्या ॲप्सवर स्पष्टपणे दर्शविली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.












