‘तिवरे’ गावात दीडशे ‘वृक्षरोप’ लागवड अभियान

तरुणाईचा पुढाकार; संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली

तिवरे (चिपळूण) : कोकणात लांबलेल्या पावसाच्या आगमनदिनी मोठ्या उत्साहात (शनिवारी) येथील दसपटी विभागाच्या श्रीरामवरदायिनी शिक्षण संस्था आकले संचलित न्यू इंग्लिश स्कूल तिवरे विद्यालयाचे प्रांगण हिरवेगार करण्याच्या हेतूने वृक्षरोप लागवड अभियान संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध बीजपुरवठादार ‘वनश्री’ महेंद्र घागरे, रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी, मान्यवरांसह ढोलताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढली. यानंतर औक्षण, श्रीसरस्वती व वृक्षपूजन करण्यात आले. या वृक्षरोप लागवड अभियानासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक यांनी आपल्या रोपवाटिकेतून १५, सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश (बापू) काणे यांनी १०, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांनी १०, सामाजिक वनीकरण कार्यालयातर्फे सहयोग कराडे व सहकाऱ्यांनी १५ वृक्षरोपे उपलब्ध करून दिली. तिवरे विद्यालयाच्या कंपाउंडमध्ये पन्नास वृक्षरोपे, शंभर वृक्षरोपे श्रीव्याघ्रांबरी देवी मंदिर परिसरात आणि गावठण मध्ये लावण्यात आली. शंभर रोपे माजी विद्यार्थ्यांनी विकत आणली. दरवर्षी अधिकाधिक पारंपरिक वृक्षरोप लागवड करून गावातील ‘देवराई’ जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प यावेळी तरुणाईने जाहीर केला.

‘सह्याद्री’ ही न बोलता भरपूर देणारी संपत्ती – ‘वनश्री’ महेंद्र घागरे
आजूबाजूला असलेली ‘सह्याद्री’ची संपत्ती बोलणारी नसली तरी भरपूर देणारी आहे. पिढ्यानपिढ्या आपल्यावर या वृक्षराजीचे उपकार आहेत. तिची तोड न करता संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. प्रत्येक गोष्टीत शासनाकडे बोट न दाखवता आपण स्वतः स्वत:ची जबाबदारी उचलायला शिकलं पाहिजे, असे आवाहन महेंद्र घागरे यांनी केले.

संपूर्ण दसपटीत वृक्षरोप लागवड चळवळ पसरावी – निलेश बापट
तिवरे गावात गेली तीस वर्षे येतोय. आज पिढी बदललेली आहे. निसर्गातील प्रत्येक घटक आपली पुढची पिढी सक्षम घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसे आपण प्रयत्न करूया. दसपटीत वृक्षरोप लागवड चळवळीची झालेली सुरुवात या भागात सगळ्या गावात पसरावी अशी अपेक्षा मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांनी व्यक्त केली.

प्रत्येकासाठी ‘पर्यावरण’ शिक्षण काळाची गरज – धीरज वाटेकर
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत पुढे आला आहे. भविष्यात या लोकसंख्येला पुरवू शकेल इतकी संसाधने आपल्याकडे उपलब्ध असतील का? त्यामुळे पर्यावरणीय आव्हानांबद्दल जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी आहे. होईल, समज वाढेल. पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकाला पर्यावरणीय शिक्षण आवश्यक आहे, असे पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते व लेखक धीरज वाटेकर यांनी सांगितले. वाटेकर यांनी पुढे बोलताना, ‘बापट आणि घागरे’ यांच्यासारख्या पर्यावरणातील जाणकार व्यक्तिमत्त्वांचा आज लाभलेला सहवास स्मरणबद्ध करावा असे आवाहन विद्यार्थ्याना केले. गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्रीव्याघ्राम्बरी देवीच्या मंदिर सभागृहात आभार मानताना वाटेकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलेली ‘गावाचा वाढदिवस’ ही संकल्पना विषद केली. ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेक वर्षांपूर्वी दिला होता. याच दिवशी ‘राळेगणसिद्धी परिवार’ गावाचा वाढदिवस करते याची माहिती त्यांनी दिली. या माध्यमातून सामाजिक प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न होतो. तिवरे गावात एकवटलेल्या युवाशक्तीने गावाची प्रतिष्ठा वाढविण्याकामी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला ‘सर्पमित्र’ अनिकेत चोपडे, केंद्रप्रमुख सौ. शैलजा आखाडे, रामभाऊ लांडे, पर्यावरण मंडळाचे कार्याध्यक्ष एम. के. पाटील, सौ. मायावती शिपटे, सौ. संगिता गावडे, निवृत्त अभियंता सतीश वीरकर, तिवरे संस्था उपाध्यक्ष व शाळा समिती चेअरमन नरसिंगराव शिंदे, प्रसिद्ध ट्रेकर अरुण पुजारे, माजी सरपंच हनुमंत शिंदे, हरिश्चंद्र शिरकर, निवृत्त प्रा. सुरेश जांबोटकर सर, सौ. सुजाता जांबोटकर, रविंद्र कुलकर्णी, रविंद्र शिंदे, विकास शिंदे, रविंद्र गवळे, सौ. तृप्ती कुबडे, विजय जांभळे, कृष्णाजी शिंदे, राकेश शिंदे, विश्वास शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक शाळेच्या माजी विद्यार्थी समूहाचे प्रतिनिधी अमित शिंदे, प्रतिक शिंदे सहकारी विपुल शिंदे, सचिन शिंदे, वैभव कदम, धंनजय शिंदे, सौरभ शिंदे, ओंकार शिंदे, प्रशांत शिंदे, निखिल शिंदे, साहिल शिंदे, चैतन्य शिंदे, मंगेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीधर जोशी तर आभार उत्तम शिंदे यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि युवावर्ग विशेष मेहनत घेत आहेत.