डोळ्यांना जास्त ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे- नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. सुहास देसाई
लांजा ( प्रतिनिधी) डोळे हे मानवी शरीरातील एक महत्त्वाचे ज्ञानेन्द्रिय आहे. मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच
डोळ्यांची नियमित तपासणी करून डोळ्यांना जास्त ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,असे प्रतिपादन नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. सुहास देसाई यांनी जावडे येथे केले.
श्रीराम वंजारे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा तसेच ग्रामीण रुग्णालय लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे या प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. सुहास देसाई बोलत होते. यावेळी लांजा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल मराठे, हेरिटेज संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी हेरिटेज प्रयोगभूमितील तीनही शाळातील सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच यावेळी लांजा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ग्रंथ संकलन उपक्रमांतर्गत जमा झालेली सुमारे २०० पुस्तके न्यू इंग्लिश स्कूल जावडे व माध्यमिक आश्रम शाळा जावडेच्या ग्रंथालयासाठी भेट म्हणून देण्यात आली यावेळी प्रा. डॉ. राहुल मराठे व संस्थापक संतोष कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्था व शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.












