वेंगुर्ले येथे अ.भा.वि.प. तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) वेंगुर्ला शाखेच्या वतीने येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या मंचावर प्रमुख वक्ते डॉ. प्रा. श्रीराम दीक्षित आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक श्री. विनीत परब उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अभाविप सावंतवाडी शहर मंत्री ज्ञानेश्वर गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हा संयोजक विनीत परब यांनी उपस्थितांना अभाविपची ओळख करून दिली. प्रमुख वक्ते श्री. दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या वाकडे हिने केले तर देवेन कर्पे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.