मोरवंडे सुतारवाडी अंगणवाडी सेविका भरतीत गंभीर गोंधळ; भरतीपूर्वीच उमेदवाराचे नाव जाहीर – ग्रामस्थ आक्रमक

खेड (प्रतिनिधी):
खेड तालुक्यातील मोरवंडे सुतारवाडी येथील अंगणवाडी सेविका पदासाठी झालेली भरती प्रक्रिया सध्या मोठ्या वादात सापडली आहे. या भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता, माहिती लपवणे, नियमांचे उल्लंघन, तसेच निवड होणाऱ्या उमेदवाराचे नाव अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गावात जाहीर झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या भरतीची सखोल चौकशी करून ती तत्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

*भरतीपूर्वीच उमेदवार ठरलेला? – महिला पोलीस पाटलांची कबुली व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये*

या भरती प्रक्रियेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एक गावातील युवती जेव्हा अर्ज करण्यास उत्सुक होती, तेव्हा तिने गावातील महिला पोलीस पाटलांशी संपर्क साधला. त्यावेळी त्या पोलीस पाटलांनी “कशाला अर्ज करतेस? घाणेकर बाईंच्या सुनेचीच नियुक्ती होणार आहे” असे थेट सांगितले. हा संवाद व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये स्पष्टपणे आढळून आला असून, त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया आधीच ठरलेली होती का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

*समान गुणधारक दोन उमेदवार – पण निवड फक्त एकाचीच!*

सदर सेविका पदासाठी अर्ज केलेल्या दोन महिलांना एकसारखे गुण मिळाले होते. मात्र निवड केवळ एका उमेदवाराची करण्यात आली. शासनाच्या २ फेब्रुवारी २०२३ च्या निर्णयानुसार, अशा स्थितीत दोघींच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निवड करावी, असा स्पष्ट नियम आहे. मात्र, या प्रकरणात अशा कोणत्याही प्रकारची पारदर्शक प्रक्रिया न राबवता थेट नियुक्ती केल्याचा आरोप आहे.

*अर्जामधील माहितीमध्ये अपघात नाही तर हेतुपुरस्सर लबाडी?*

या भरती प्रक्रियेमधील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, काही उमेदवारांच्या अर्जामधील माहिती जाणीवपूर्वक चुकीची भरल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहरणार्थ, काही अविवाहित महिलांना दोन अपत्य असल्याचे दर्शवले गेले आहे. तर काही विवाहित महिलांना प्रत्यक्षात अपत्य असूनही ‘नाही’ असे नमूद करण्यात आले आहे. ही गंभीर लबाडी असून, पात्र उमेदवारांचा हक्क बळकावला गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

*माहिती अधिकारात विभागीय विरोधाभास स्पष्ट – कोण सत्य सांगते?*

या प्रकरणात ग्रामस्थांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली असता, महिला व बालकल्याण विभागाने “सदर भरतीसाठी कोणतीही अधिकृत नियुक्ती आम्ही केलेली नाही,” असे लेखी उत्तर दिले. परंतु याच भरतीसंदर्भात खेड पंचायत समितीने ग्रामपंचायतीला नियुक्तीचे पत्र पाठवले आहे. यामुळे विभागीय समन्वयाचा अभाव स्पष्ट होत असून, प्रशासनाची जबाबदारी झाकण्यासाठी ही साखळी रचण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

*ग्रामस्थांची आक्रमक भूमिका – भरती रद्द करून चौकशीची मागणी*

संपूर्ण भरती प्रक्रियेमुळे गावात तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांनी सदर भरती प्रक्रियेतील सर्व दस्तऐवज, गुणपत्रिका, अर्ज तपशील आणि नियुक्ती संबंधित पत्रव्यवहारांची तपासणी व्हावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. ही भरती पारदर्शकतेच्या सर्व नियमांना फाटा देणारी आहे, असा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे.

*प्रशासनाची भूमिका ठरली निर्णायक*

या गंभीर प्रकारामुळे खेड तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास आणि दोषींवर कारवाई न केल्यास, अशा भरती प्रक्रियांनी इतर गावांमध्येही पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
मोरवंडे सुतारवाडी येथील अंगणवाडी सेविका भरती प्रकरण ही एक केवळ भरतीची प्रक्रिया नसून, संपूर्ण व्यवस्थेतील सडलेल्या व्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. अर्ज करण्यापूर्वीच उमेदवार जाहीर होतो, नियम झुगारले जातात, चुकीची माहिती खपवली जाते आणि तरीही अधिकृत नियुक्ती होते – हे सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचे असून, प्रशासनाने याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.
जर प्रशासनाने यावर वेळेवर योग्य ती कारवाई केली नाही, तर ही भरती फक्त एका गावापुरती मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील सर्व भरती प्रक्रियांवर शंका घेण्याचा मार्ग मोकळा होईल