देवगड / प्रतिनिधी
मोंड पुजारेवाडी येथील रेश्मा मनोहर पुजारे (६५) या वृद्धेला शिवीगाळ करून त्यांना चिव्याच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथील स्वप्नाली अरविंद पुजारे (२५) या संशयित महिलेविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ जुलै रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेश्मा पुजारे यांना आपल्या घरात पाणी भरावयाचे असल्याने त्या तेथील सार्वजनिक नळावर कोण आहे, हे अंगणात उभ्या राहून पाहत होत्या. तेव्हा तेथे संशयित स्वप्नाली पुजारे ही नळाखाली कपडे धूवत असल्याचे त्यांना दिसले. रेश्मा पुजारे यांनी संशयित स्वप्नाली पुजारे यांना ‘नळाच्या खाली कपडे धुऊ नको’, असे सांगितले. याचा राग आल्याने संशयित स्वप्नाली हिने फिर्यादी रेश्मा यांना शिवीगाळ केली. तसेच सार्वजनिक नळाकडून फिर्यादी रेश्मा यांच्या घराच्या अंगणात येऊन त्यांना हातातील चिव्याचा दांड्याने त्यांच्या डोकीवर तसेच उजव्या हाताच्या पंजाच्या वरती व पाठीवर मारून दुखापत केली. याबाबत रेश्मा पुजारे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित स्वप्नाली पुजारे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.











