हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्सने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक अनोखा उपक्रम राबवला. कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. ‘वृक्ष लागवडीपेक्षा त्यांचे संवर्धन आणि जतन महत्त्वाचे आहे,’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमात कॉलेजमधील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी एका झाडाला राखी बांधून ‘मी या झाडाचे जतन आणि संवर्धन करणार’ अशी प्रतिज्ञा केली. आता हे सर्व विद्यार्थी ज्या झाडाला त्यांनी राखी बांधली आहे, त्याची निगा राखणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचा दाखला देत, त्यांनी आजच्या तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्तीचाही अभ्यास करण्याचे आवाहन केले. “आपण प्रत्येकाने एक तरी वृक्ष जतन आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा करावी, यातूनच एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि आपले जीवन सुखकारक व यशस्वी होईल,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीणकुमार प्रभू केळुसकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. ‘या संकल्पामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा धडा मिळेल. विद्यार्थ्यांनी वृक्षाला आपला भाऊ मानून रक्षाबंधन निमित्ताने त्याचे संवर्धन करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे,’ असे ते म्हणाले.
यावेळी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयूर शार बिद्रे यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी पक्षी आणि प्राण्यांना खाद्य पुरवणाऱ्या झाडांची लागवड करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने करण्यात आली, जी संपूर्ण गावातून जनजागृती करत फिरली. कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य अमेय महाजन यांनी केले, सूत्रसंचालन हर्षद धुरी यांनी केले आणि आभार मनाली सावंत यांनी मानले. या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.












