कलंबिस्त । प्रतिनिधी :कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे वरीष्ठ लिपिक विष्णू रामा पास्ते यांचा ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त ‘सेवापूर्ती सदिच्छा समारंभ’ संपन्न झाला. प्रशालेत ३० वर्षांहून अधिक काळ निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत, सहसचिव चंद्रकांत राणे, विविध संचालक, सांगेली हायस्कूलचे मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष वैभव केंकरे, माजी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील, सत्कारमूर्ती विष्णू पास्ते, त्यांच्या पत्नी सौ. विनिता पास्ते, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेच्या वतीने विष्णू पास्ते यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष वैभव केंकरे यांनी आपल्या भाषणात पास्ते यांच्या कार्याची प्रशंसा केली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सांगेली हायस्कूलचे मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, माजी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील, माजी शिक्षक शरद नाईक, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पास्ते सरांच्या कार्यशैलीचा गौरव केला. विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश कदम आणि श्रावणी घोगळे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप सावंत आणि सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तांबे यांनीही संघटनेच्या वतीने पास्ते यांचा सत्कार केला. यावेळी शिरशिंगे प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर राऊळ, लिपिक सुमंत राऊळ, ओझरवाडी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि कलंबिस्त गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या सत्काराला उत्तर देताना विष्णू पास्ते यांनी संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच आपण ३० वर्षांची सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो, अशी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांनी प्रशालेसाठी तीन कपाटे भेट दिली.
यावेळी कलंबिस्तमधील प्रतिष्ठित नागरिक, निवृत्त कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले, तर विलास चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले.












