रत्नागिरीत ‘जागतिक स्तनपान सप्ताहा’ची सुरुवात; माता आणि बालकांच्या आरोग्यावर भर

रत्नागिरी – माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह’ (World Breastfeeding Awareness Week) ला रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्व आरोग्य संस्थांमध्ये या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची थीम “स्तनपानाला प्राधान्य द्या : शाश्वत सहाय्यक व्यवस्था तयार करा” अशी आहे.
या सप्ताहाचा मुख्य उद्देश बाळाचे आरोग्य सुधारणे आणि महिलांना कुठेही व कधीही स्तनपान देण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन देणे हा आहे. रत्नागिरीत ‘शून्य मातामृत्यू आणि शून्य बालमृत्यू’ हे उद्दिष्ट समोर ठेवून आरोग्य विभाग जनजागृती करत आहे.
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे या सप्ताहाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आईचे दूध हे बाळासाठी अमृतासमान आहे. प्रसूतीनंतर एक तासाच्या आत दिले जाणारे पहिले चीकदूध हे बाळाचे पहिले लसीकरण असते, ज्यामुळे त्याला रोगप्रतिकारशक्ती मिळते.”
डॉ. आठल्ये यांनी असेही सांगितले की, जन्मापासून सहा महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध देणे आवश्यक आहे. त्यानंतर स्तनपानासोबत पूरक आहार दिल्यास बाळ एका वर्षात पूर्ण जेवण घेण्यास सक्षम होते आणि कुपोषण टाळता येते. स्तनपान केवळ बाळासाठीच नाही, तर मातेलाही अनेक आरोग्यदायी फायदे देते. यामुळे बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळते, तर मातेला स्तन, गर्भाशय आणि इतर कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच, आई-बाळात भावनिक बंध निर्माण होतो.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, डॉ. वसिम सय्यद, डॉ.शायन पावसकर, डॉ.आदित्य वडगावकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘हिरकणी कक्षां’ची स्थापना
या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्षां’ची स्थापना करण्यात आली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये हे कक्ष उपलब्ध आहेत. या ठिकाणी मातांना संकोच न बाळगता स्तनपान करता येईल आणि आरोग्यसेविकांकडून आवश्यक मार्गदर्शनही मिळेल. याशिवाय, अनेक शासकीय आणि खाजगी कार्यालये, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि मॉल्समध्येही हे कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने सर्व स्तनदा मातांना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.