रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या मिरजोळे-उक्षी मार्गावरील शिळ पवार स्टॉप येथे गुरुवारी सकाळी 6.45 वा.सुमारास चालकाचा एसटीवरील ताबा सूटल्याने त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या एसटीला समोरासमोर धडक देत अपघात केला. या अपघातात 11 विद्यार्थी व 1एसटी चालक किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. जखमींवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सूरु आहेत.
या अपघातात चालक वलिखान गुलाबखान पठाण (37,रा.माळनाका,रत्नगिरी) व तन्वी रेवाळे (19,रा.दांडेआडम,रत्नागिरी),स्नेहल खापणे (17,रा.भावेआडम,रत्नागिरी),सुजल सनगरे (17,रा.भावेआडम,रत्नागिरी),प्रतिक तांबे (18,रा.भावेआडम,रत्नागिरी),सिध्देश खापणे (17,रा.दांडेआडम,रत्नागिरी),तेजस्विनी खापणे (रा.17,रा.दांडेआडम,रत्नागिरी),आदिती तांबे (17,रा.भावेआडम,रत्नागिरी),कल्याणी रेवाळे (17,रा.दांडेआडम,रत्नागिरी),श्रुती तांबे (17,रा.दांडेआडम,रत्नागिरी),सदिच्छा सनगरे (21,रा.दांडेआडम,रत्नागिरी),आर्याजाधव (21,रा.दांडेआडम,रत्नागिरी) अशी अपघातातील एसटी चालक व विद्यार्थ्यांची नावे आहेत.

गुरुवारी सकाळी जखमी एसटी चालक वलीखान पठाण हे आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-2231) मधून वाहक अमोल शिवलकर व विद्यार्थ्यांना घेउन भावेआडम ते रत्नागिरी असा येत होता. त्याच सुमारास प्रफूल्ल नागवेकर हे आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-4459) मधून वाहक गुरु मुद्रे व इतर प्रवाशांना घेउन रत्नागिरी ते दांडेआडम असे जात होते.


या दोन्ही एसटी शिळ पवार स्टॉप येथे समोरा-समोर आल्या असता विद्यार्थी घेउन रत्नागिरी दिशेने येणाऱ्या एसटी वरील चालक वलिखान पठाण याचा आपल्या ताब्यातील भरधाव एसटीवरील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या एसटीला जोरदार धडक देत हा अपघात केला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इतर नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थी आणि चालकाला रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली होती. या अपघातात दोन्ही एसटींच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.














