शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचा सल्ला
रत्नागिरी: प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे.
भात शेतीसाठी महत्त्वाचा सल्ला:
* भात पिकाला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून शेतातील बांधांची दुरुस्ती करावी आणि बांध तणमुक्त ठेवावेत.
* पुनर्लागवडीची कामे पावसाची तीव्रता कमी झाल्यावर पूर्ण करावीत.
* १२ ते १५ सेंमी उंचीची आणि ५ ते ६ पाने फुटलेली रोपे लागवडीसाठी वापरावीत.
* भाताच्या पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांपर्यंत शेतात २.५ ते ५ सेंमी पाण्याची पातळी राखावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* जूनच्या शेवटच्या आठवड्यात पुनर्लागवड केलेल्या भात खाचरात बेणणी करून नत्र खताची दुसरी मात्रा (८७० ग्रॅम युरिया प्रति गुंठा) ३० ते ४० दिवसांनी द्यावी.
आंबा आणि नारळ बागांसाठी सल्ला:
* नारळ पिकावर कोंब कुजण्याचा रोग दिसू शकतो, त्यामुळे कुजलेला कोंब काढून १% बोर्डो मिश्रण टाकावे.
* प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाची उघडीप पाहून कोंबावर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
* नियमित फळधारणेसाठी आंबा पिकाला १५ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान झाडाच्या आकारमानानुसार पॅक्लोब्युट्रॉझॉल द्यावे.
इतर पिकांसाठी मार्गदर्शन:
* काजू बागेत फांदेमर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड (०.३%) किंवा बोर्डो मिश्रणाची (०.१%) फवारणी करावी.
* सुपारी पिकाला कोळेरोग या बुरशीजन्य रोगापासून वाचवण्यासाठी १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
* वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी शिऱ्या किंवा मंडपाची व्यवस्था करावी. तसेच, किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएटची फवारणी करावी.
कुक्कुटपालनासाठी सूचना:
* ब्रॉयलर पक्ष्यांना त्यांच्या वजनानुसार ब्रॉयलर स्टार्टर आणि नंतर ब्रॉयलर फिनिशर खाद्य द्यावे.
* मांसातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी खाद्यात १.५% काळे जिरे पूड किंवा ०.५% हळद पूड मिसळावी.
* पक्ष्यांना दिवसातून किमान ३ वेळा ताजे आणि स्वच्छ पाणी द्यावे.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.












