कारवार–बंगळुरू आणि कारवार–मडगाव एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तात्पुरत्या डबे वाढीला मुदतवाढ

२ ऑक्टोबरपासून १ फेब्रुवारी २०२७पर्यंत वाढीव डब्यांची सुविधा

देवगड : प्रतिनिधी

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने केएसआर बंगळुरू–कारवार–केएसआर बंगळुरू ‘पंचगंगा एक्स्प्रेस’ तसेच कारवार–मडगाव जंक्शन–कारवार एक्स्प्रेस या गाड्यांना करण्यात आलेल्या तात्पुरत्या अतिरिक्त डब्यांच्या जोडणीला मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक १६५९५ केएसआर बंगळुरू–कारवार पंचगंगा एक्स्प्रेसला २ ऑक्टोबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. तर गाडी क्रमांक १६५९६ कारवार–केएसआर बंगळुरू पंचगंगा एक्स्प्रेसला ३ ऑक्टोबर २०२६ ते १ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

तसेच गाडी क्रमांक १०११० कारवार–मडगाव जंक्शन एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १०१०९ मडगाव जंक्शन–कारवार एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना ३ ऑक्टोबर २०२६ ते १ फेब्रुवारी २०२७पर्यंत अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.

या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत २ थ्री टियर एसी इकॉनॉमी, १ स्लीपर आणि २ जनरल डबे वाढविण्यात आले आहेत. अतिरिक्त डब्यांनंतर या गाड्यांची एकूण संरचना १९ एलएचबी डब्यांची असेल.

सणासुदीच्या काळात तसेच त्यानंतरही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने ही तात्पुरती डबे वाढीची सुविधा वाढवली आहे. प्रवाशांनी या अतिरिक्त सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

विशेष गाड्यांचे सविस्तर थांबे व वेळापत्रक भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.