खेड (प्रतिनिधी):
दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी खेड-तुळशी-विन्हेरे-महाड मार्गावरील प्रवाशांनी एस.टी. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सणासुदीच्या काळातच सुरु करण्यात येणाऱ्या खेड-तुळशी-बोरीवली (रात्री ८.३०), खेड-तुळशी-ठाणे-नालासोपारा-विरार (सकाळी ८.३०) आणि खेड-तुळशी-कल्याण-विठ्ठलवाडी (सकाळी १०.००) या तीन गाड्यांना प्रवाशांनी बारमाही करण्याची वारंवार मागणी केली आहे. मात्र अजूनही या गाड्या नियमित करण्यात आलेल्या नाहीत.
सदर तीनही गाड्यांना मुंबई सेंट्रलकडून प्रशासकीय मंजुरी असूनही, त्या बारमाही न करण्यामागे खेड आगारातील कर्मचाऱ्यांची आळशी व पक्षपाती भूमिका असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार या गाड्यांचे उत्पन्न समाधानकारक असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
पूर्वीचे डेपो मॅनेजर श्री. करवंदे यांनी काही गाड्या बारमाही केल्या होत्या, त्याच धर्तीवर नवीन गाड्याही नियमित करण्याची गरज आहे. मात्र, सध्या खेड आगाराचे डेपो मॅनेजर श्री. रणजीत राजेशिर्के हे संघटनेतील काही पुढाऱ्यांच्या सांगण्यानुसार निर्णय घेत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या गाड्यांचे बारमाहीकरण, खेड आगारप्रमुखांची बदली आणि एकाच ठिकाणी २०-२२ वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या या तीन प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी विभाग नियंत्रक कार्यालय, रत्नागिरी येथे आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित प्रवाशाने दिला आहे. या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास डिसी प्रज्ञेश बोरसे व वाहतूक अधिकारी रत्नागिरी हे जबाबदार राहतील, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सदर प्रकारामुळे खेड आगारातील प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनीही या प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली आहे.










