राजापुरात पुन्हा चोरटयांनी डोकं वर काढले

 

करक येथील श्री लक्ष्मी रवळनाथ मंदिरातील पुरातन घंटा चोरटयांनी लांबविल्या

राजापूर l प्रतिनिधी तालुक्यात गेल्या महिनाभरात झालेल्या कोंडये, राजापूर शहर परिसरातील चोऱ्यांचा तपास लावण्यात राजापूर पोलीसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र आता आता चोरट्यांनी आपला मार्चा ग्रामीण भागातील मंदिराकडे वळवीला असून तालुक्याच्या करक येथील श्री लक्ष्मी रवळनाथ मंदिरात बांधलेल्या तांब्याच्या धातुच्या पुरातन घंटा अज्ञात चोरटयांनी लांबविल्या आहेत.

शुक्रवारी रात्री ८.३० ते शनिवारी सकाळी ९ या वेळेत हा चोरीचा प्रकार घडला आहे. या चोरीमुळे या परीसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणी लक्ष्मी रवळनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनंत गंगाराम ऐनारकर यांनी रायपाटण पोलीस दुरक्षेत्र कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान रायपाटण पोलीस दूरक्षेत्रच्या पोलिसांनी घटना स्थळी जावून पहाणी केली.

करक येथील श्री लक्ष्मी मंदिर हे अर्जुना धरणाच्या पुनर्वसन वस्ती पासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर डोंगराळ परिसरामध्ये आहे. या मंदिरात सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच्या जुन्या घंटा होत्या. शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्या मंदिरामध्ये प्रवेश करून तेथील सुमारे दहा ते बारा घंटा चोरल्याची घटना घडली. ही बाब सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या लक्षात आली. ज्यावेळी भाविक मंदिरात गेले त्यावेळी तेथील घंटा ह्या जागेवर नव्हत्या. मंदिरातील घंटा चोरीला गेल्याचे निदर्शनाला येतात गावचे पोलीस पाटील महेंद्र जाधव यांनी तात्काळ रायपाटण पोलीस दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील यांना मोबाईल वरून संपर्क साधून झाल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर रायपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि झालेल्या चोरीची पाहणी केली. त्या चोरी प्रकरणी लक्ष्मी रवळनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनंत गंगाराम ऐनारकर यांनी रायपाटण पोलीस दुरक्षेत्र कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आहे.

सदर मंदिरातील घंटा या सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीच्या होत्या. आणि त्याची किंमत साडेचार हजार इतकी असल्याची माहिती पोलीसांनी दिली.