रत्नागिरी: शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या ई-सिगारेटच्या (Vape) सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका विशेष मोहिमेअंतर्गत तेली आळी नाका येथील ‘जय गगनगिरी जनरल स्टोअर’वर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १,७२,५००/- रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांनी पोलिसांकडे विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये ई-सिगारेट आढळत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ई-सिगारेट विक्री करणाऱ्यांवर शोध मोहीम सुरू केली होती.
आज, सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी एका गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जय गगनगिरी जनरल स्टोअरवर छापा टाकला. त्यावेळी दुकानाचा मालक गोविंद दिनेश गजरा (वय ४१) याच्याकडून हा ई-सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई ‘ईलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा २०१९’च्या कलम ७ व ८ नुसार करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
याशिवाय, पोलीस अधीक्षक साहेब यांनी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, बिडी, सिगारेट विक्री करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन पुरवठा व वितरण कायदा २००३ नुसार कारवाई केली जाईल. नागरिकांना आणि शिक्षकांना अशा प्रकारची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.











