आबलोली बाजारपेठेत वाद्य दुरुस्तीच्या कामाला वेग

अनिल पालशेतकर यांच्या वाद्यालयात कारागिरांची लगबग सुरू

आबलोली
गणेशोत्सव आणि कोकण यांचं अतूट नातं आहे. गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला असताना कोकणात गणरायाच्या स्वागताच्या तयारी मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे दिसून येत आहे.गणपती मध्ये कोकणात आनंदाचे वातावरण असते आणि या आनंदाला द्विगुणीत करण्यासाठी आरत्या, भजन, शक्ती तुऱ्याचे नाच, जाखडी यांसह विविध उत्साहाच्या कलांचे उत्स्फूर्त सादरीकरण आबालवृद्ध करीत असतात. या सर्व कलाविष्कारासाठी महत्त्वपूर्ण साथ असते ती वाद्यांची. सध्या आबलोली बाजारपेठेत अनिल कृष्णा पालशेतकर यांच्या वाद्य निर्मिती आणि दुरुस्तीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात वाद्य निर्मिती, दुरुस्तीची लगबग सुरू असल्याचे दिसून येते.
आबलोली बाजारपेठ ही परिसरातील सुमारे वीस-पंचवीस गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत लगबग दिसून येत आहे.अनिल कृष्णा पालशेतकर यांच्या वाद्यालयात सध्या पखवाज, नाळ, ढोलकी, ताशा, ढोल, मृदुंग यांची दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.यांच्याकडे या सर्व प्रकारचे नवीन साहित्य सुद्धा विक्रीला उपलब्ध आहेत.
अनिल पालशेतकर यांच्या चार पिढ्या या व्यवसायात असून परंपरेने अनेक वर्षे ही सेवा परिसरातील गणेश भक्तांसाठी देत आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात वाद्य विक्री आणि दुरुस्ती यामध्ये मोठ्या प्रमाणात दर वाढ होत असताना आपल्या ग्राहकांसाठी, गणेश भक्तांसाठी योग्य दरात विक्री आणि दुरुस्ती देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे अनिल पालशेतकर सांगतात. त्यांना या व्यवसायामध्ये त्यांचे आई-वडील, पत्नी, मुले आणि कुटुंबीय यांचे सहकार्य लाभते. आपल्याकडे वाद्य दुरुस्तीसाठी आलेल्या गणेश भक्ताला चांगल्या पद्धतीचे आणि योग्य वेळेत वाद्य दुरुस्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नवीन वाद्याची पारख आणि दुरुस्त झालेल्या वाद्याची गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी गणेश भक्त वाद्य वाजवून पाहतात त्यामुळे बाजारपेठेत ही गाण्याचे आणि वाद्याचे ताल घुमू लागले आहेत.
अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सव घेऊन ठेवला असून गणरायाच्या आगमनाची तयारी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सुरू असल्याचे चित्र आबलोली बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.