सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बांदा येथील कु. प्रेरणा जय भोसले हिने सुवर्णपदक पटकावून आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. सोमवारी क्रीडा संकुल, ओरोस येथे झालेल्या या स्पर्धेत तिने हे विशेष यश संपादन केले.
या स्पर्धेत कणकवली, सावंतवाडी, आंबोली, मळगाव आणि बांदा येथील एकूण ५० बॉक्सिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांमध्ये प्रेरणाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
प्रेरणाला बॉक्सिंगचे प्रशिक्षण प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. तिच्या यशात त्यांच्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. तसेच, ती पत्रकार जय भोसले यांची कन्या असून बांदा येथील खेमराज ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे.
प्रेरणाने मिळवलेल्या या सुवर्णपदकामुळे केवळ तिच्या कुटुंबातच नव्हे, तर बांदा शहरातही आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या यशाबद्दल खेमराज कॉलेज आणि बांदा शहरातील अनेक मान्यवरांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.












