पेंडूर तलाव बंधारा उभारणीसाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग!

लोकसहभागातून श्रमदानाचा आदर्शवत उपक्रम ; ‘आजचे श्रमदान उद्याच्या पाणी शाश्वती’चा संदेश

मालवण | प्रतिनिधी : यंदाच्या अत्यल्प पावसामुळे आगामी काळात पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन पेंडूर ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी पुढाकार घेतला आहे. पेंडूर तलाव येथे लोकसहभागातून बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करत जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला.

ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्या वतीने या विशेष श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत पेंडूरसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, तरुण, महिला आणि निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नागरिकांनी स्वतःहून पुढे येत बंधारा बांधणीच्या कामात श्रमदान केले. पेंडूर तलाव हा परिसरातील महत्त्वाचा जलस्रोत असून, तलावातील पाण्याचा थेट परिणाम परिसरातील विहिरींच्या जलपातळीवर तसेच शेतीच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होतो. त्यामुळे तलावातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम महत्त्वाचे ठरणार आहे.

यावेळी ग्रामस्थांनी तलाव परिसरात एकत्र येत जलसंधारणाच्या कामाला हातभार लावला. तलावाचे संवर्धन, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पेंडूर तलाव हा केवळ पाण्याचा स्रोत नसून परिसराच्या नैसर्गिक आणि जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठेवा आहे. त्यामुळे या नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असा संदेश या श्रमदानातून देण्यात आला.

‘आजचे श्रमदान म्हणजे उद्याच्या पाण्याची शाश्वती’ या भावनेतून ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि जलसंधारणासाठीची जिद्द कौतुकास्पद ठरली. लोकसहभागातून उभारण्यात येणारा हा बंधारा आगामी काळात पाणीसाठा टिकविण्यास आणि परिसरातील भूजलपातळी वाढविण्यास उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पेंडूर ग्रामस्थांचा हा उपक्रम जलसंधारणाच्या क्षेत्रात लोकसहभागातून उभा राहिलेला प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.