खेड – ( प्रतिनिधी )
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ‘इको क्लब’ अंतर्गत रोटरी स्कूलमध्ये ’जलसंवर्धन दिन’ उत्साहात साजरा झाला.
सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षिका मिनाक्षी निवाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाणी हे आपले जीवन आहे ते जपून वापरले पाहिजे. पाणी हे आपल्या स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी आवश्यक आहे. पाणी हे आपल्या जीवनाचे सार आहे हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी पाण्याचे महत्त्व जाणले पाहिजे. ’पाणी वाचवा, जीवन वाचवा’ या उक्तीप्रमाणे सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचे संवर्धन केले पाहिजे असे सांगितले.
जलसंवर्धन दिनाचे औचित्य साधून समाजामध्ये जल अभियान किंवा जलशक्ती त्याचप्रमाणे जलसंवर्धन कसे करायचे, याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील कलाशिक्षिका सौ. मानसी देवघरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभातफेरीसाठी विद्यार्थ्यांनी ’पाणी वाचवा’ या विषयावर आधारित विविध चित्रे रेखाटली होती. विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ’थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग सुखी भविष्याचा’, ’पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न’ अशा विविध घोषणा देत पाणी बचतीचे महत्त्व नागरिकांना सांगितले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.










