अखेर विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील निकृष्ट दर्जाचे दरवाजे उतरवणार

तत्कालीन संदर्भाशी मिळते जुळते दरवाजे पुन्हा बसवणार

    भारतीय पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय 

     बाळा कदम ( विजयदुर्ग) : असंख्य इतिहासप्रेमींची प्रचंड नाराजी असल्याने आणि ऐतिहासिक संदर्भाशी मिळते जुळते नसल्याने विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले प्रत्येकी एक-एक टनाचे दरवाजे अखेर काढण्यात येणार असल्याचे केंद्रीय पुरातत्त्व विभाग, विजयदुर्ग उपमंडळ संरक्षक सहाय्यक राजेश राजेश दिवेकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे इतिहास प्रेमींनी समाधान व्यक्त केलं आहे. या दरवाजाची बांधणी आणि वापरलेले कोवळे लाकूड या संदर्भात विजयदुर्ग ग्रामपंचायत, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान ( सिंधुदुर्ग विभाग), गडकिल्ले संवर्धन संस्था( कोकण विभाग) या सर्वांनीच आपला संताप व्यक्त करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. आर्कोमो कंपनीने हा दरवाजा विजयदुर्ग किल्ल्यासाठी बनविला होता. मात्र इतिहासप्रेमी संघटना आणि अनेक व्यक्तींनी मोठी नाराजी व्यक्ती केल्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने आर्किमो कंपनीला सदर दरवाजा काढून ऐतिहासिक संदर्भाशी मिळताजुळता दरवाजा आणि तत्कालीन पूरक दरवाजा नव्याने बनविण्यात यावा असं सांगण्यात आले.

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला काही दिवसापूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने लाकडी दरवाजे बसविले. साधारण एक-एक टनाचे हे दोन दरवाजे वादामध्ये सापडले होते. या लाकडाचा दर्जा आणि बांधणी निकृष्ट दर्जाची असल्याने विजयदुर्ग ग्रामस्थ तसेच इतिहासप्रेमींमधून संताप व्यक्त होत होता. या संदर्भात विजयदुर्ग ग्रामपंचायतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले होते. प्रत्यक्ष पाहणी करण्याची त्यांना विनंती करण्यात आली होती. या पत्रात कोवळे आणि निकृष्ट दर्जाचे लाकूड वापरल्याने तसेच त्याची बांधणीही पूर्वीच्या दरवाजाप्रमाणे नसल्यामुळे पुरातत्व विभागाच्या नियमावलीस अनुसरून या दरवाजाचे काम झाल्याचे दिसत नाही असा उल्लेख करण्यात आला होता. ही बाब अतिशय संवेदनशील आणि लोकभावनेची असल्याने पुरातत्त्व विभागाला कळविण्यात यावी असं प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. दरम्यान, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहाय्यक राजेश दिवेकर यांच्याशीही संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी सदर दरवाजाला तत्कालिन कामाचा बाज नसून बरीच वर्षे काम चालू असतानाही दरवाजाचे काम निकृष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता इतिहासप्रेमींची आणि संघटनांची दखल घेऊन हा दरवाजा नव्याने बसविण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र ज्या ज्या वेळी विजयदुर्गच्या इतिहासाला धक्का पोहोचेल किंवा अशा प्रकारचं काम होईल त्या त्या वेळी विजयदुर्ग ग्रामस्थ नक्कीच आक्रमक होतील असा इशारा विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी दिला आहे.

चौकट

विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाची पाने चाळताना काही संदर्भ हाती लागले. यामध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर शेवटचे युद्ध झालं ते १७५६ साली. तुळाजी आंग्रे विरुद्ध इंग्रज आणि पेशवे. या लढाईत तुळाजी आंग्रेनी माघार घेतली. त्यानंतर सहा महिने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता. हा किल्ला पुन्हा पेशव्यांच्या ताब्यात आला आणि १८१८ पर्यंत विजयदुर्ग किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होत्या. आनंदराव धुळप त्यावेळी आरमार प्रमुख होते. १८१८ नंतर हा किल्ला कृष्णराव धूळपांकडे गेला. त्यावेळीही नौदल होतं. दरम्यानच्या काळात या मुख्य दरवाजाचे काही नुकसान झालं असेल तर त्यावेळी धुळपानी त्याची डागडुजी केली होती. म्हणजेच १८१८ नंतर इंग्रजांनी पेशव्यांकडून हा पुन्हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे काही अवशेष होते.

दोनशे वर्षांपूर्वी या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला मृतावस्था यायला सुरुवात झाली होती. मात्र २०० वर्षानंतर काही दिवसांपूर्वीच हा दरवाजा नव्याने बसविण्यात आला होता. पण त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इतिहासप्रेमीप्रेमीमधून स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली.