सातार्डा भटवाडी येथे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी रचला सापळा

चार दिवसांपूर्वी बिबट्याने केला होता तरुणीवर हल्ला

सावंतवाडी :
सातार्डा-भटवाडी येथे तरुणीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या जलद कृती दलाने अखेर घटनास्थळी पिंजरा लावून सापळा रचला आहे.

याबाबतची मागणी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर तसेच पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केली होती.

​सावंतवाडी – सातार्डा राज्यमार्गावरील सातार्डा-भटवाडी येथील जंगलमय भागात चार दिवसांपूर्वी क्लासवरून दुचाकीने घरी परतणाऱ्या तन्वी प्रमोद कवठणकर या १९ वर्षीय कॉलेज तरुणीवर बिबट्याने अचानक झडप घातली होती. या प्राणघातक हल्ल्यात तरुणी दुचाकीवरून कोसळून गंभीर जखमी झाली होती. या थरारक घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून, बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी जोर धरत होती.

​या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेत पिंजरा उभारला असून, त्यात शिकारीच्या आमिषाने बोकड ठेवण्यात आले आहे.

​या कारवाईदरम्यान सातार्डा विभागाचे पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या जीविताला असलेला धोका टाळण्यासाठी वनविभागाने या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी उदय पारिपत्ये यांनी केली आहे.