‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर
सावंतवाडी । शुभम सावंत : सावंतवाडी तालुक्यात भक्तिमय वातावरणात आणि वाजत-गाजत विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज दीड दिवसानंतर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तालुक्यातील विविध गावांमधील घरगुती गणपतींचे आज संध्याकाळी स्थानिक नद्या, तलाव आणि विसर्जन घाटांवर विसर्जन करण्यात आले.
सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी तालुक्यातील घराघरांत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्रींची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवसांच्या पाहुणचारानंतर आज आरती, मंत्रपुष्पांजली आणि उत्तरपूजा करून लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी नेण्यात आले.
विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच बाप्पाच्या विसर्जनात सहभाग घेत भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.














