खेडमध्ये एस.टी. बसला डंपरची धडक; शेल्डी गावठाणचे पती-पत्नी गंभीर जखमी,

अपघातानंतर पळून जाणाऱ्या डंपरला एस.टी. चालकाने पाठलाग करून पकडला

खेड तालुक्यातील बहिरवली फाट्याजवळ ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास एस.टी. बस आणि डंपरमध्ये अपघात होऊन शेल्डी गावठाण येथील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी थांबला नसून पळून गेला. मात्र, एस.टी. चालकाने प्रसंगावधान राखून पाठलाग करत डंपर थांबवला.

एस.टी. बस चालक रमेश योगाजी कामटे (वय ४४, रा. शेलू, ता. जि. परभणी) हे त्यांच्या ताब्यातील एस.टी. बस (MH-20-BL-2580) खेडहून दापोलीकडे घेऊन जात होते. ते रस्त्याच्या डाव्या बाजूने नियमीत आणि सुरक्षितपणे वाहन चालवत असताना बहिरवली फाट्याजवळ समोरून येणाऱ्या सफेद-लाल रंगाच्या डंपरने निष्काळजीपणे, अति वेगात व रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता बसच्या ड्रायव्हर साइडच्या मध्यभागी जोरदार धडक दिली.

या धडकेत शेल्डी गावठाण येथील संकेत सुभाष जगताप (वय २६) आणि सोनाली संकेत जगताप (वय २४) हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. मात्र, एस.टी. चालक रमेश कामटे यांनी प्रसंगावधान राखत एका दुचाकीला थांबवले आणि त्या दुचाकीस्वाराच्या मदतीने डंपरचा पाठलाग सुरू केला. डंपर चालकाने गाडी तिसे रोडकडे वळवली, परंतु पुढे जाऊन एस.टी. चालकाने डंपर थांबवला. त्या वेळी डंपरचा क्रमांक MH-08-W-8205 असल्याचे दिसून आले.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून डंपर चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.