जंतरमंतरवरील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवर रामदास कदमांची मिश्किल टीका; “बाळासाहेबांच्या विचारांवर भूमिका स्पष्ट करा”

खेड प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्किल शब्दांत टीका केली. खेड तालुक्यातील जामगे येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर विविध प्रश्न उपस्थित केले.
रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला गेले, हे पाहून मला समाधान वाटले. त्यांच्या राजकीय आयुष्यात प्रथमच ते एखाद्या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दिल्लीला जाऊन त्यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला. आम्ही म्हणतो, तुम्ही दिल्ली सांभाळा आणि महाराष्ट्र आम्ही सांभाळतो.”
यावेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी आपण बाळासाहेबांच्या विचारांशी सहमत आहोत की नाही, याबाबत राज्यासमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली. तसेच प्रभू श्रीराम मंदिरासंदर्भातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्यापूर्वी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच अशा विषयांवर बोलण्याचा नैतिक अधिकार असल्याचा दावा करता येईल, असेही त्यांनी म्हटले.
राजकारणात स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून, ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.