रत्नागिरी –
रत्नागिरी नगर परिषद आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील कु. विदुला रामकृष्ण कुलकर्णी हिने कनिष्ठ महाविद्यालयीन गटात तृतीय क्रमांक मिळवत सुयश संपादन केले.
ही स्पर्धा विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडली. “आजची पत्रकारिता टिळकांच्या नजरेतून” या विषयावर विदुलाने सुसंगत विचार मांडले. लोकमान्य टिळकांच्या काळातील पत्रकारितेचे उद्दिष्ट, त्यातील वैचारिक स्पष्टता, समाज प्रबोधनाची भूमिका आणि आजच्या पत्रकारितेतील बदलती मूल्यव्यवस्था या मुद्द्यांची प्रभावी मांडणी करून तिने परीक्षकांची दाद मिळवली.
या स्पर्धेचे परीक्षण सहाय्यक शिक्षक श्री. भालचंद्र रानडे व सौ. मानसी चव्हाण यांनी केले. कु. विदुलाला सहाय्यक शिक्षिका सौ. सुप्रिया टोळ्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रत्नागिरी नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात पार पडला. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. वैभव गारवे यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्त्या डॉ. निधी पटवर्धन यांच्या हस्ते विदुलाचा प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आणि पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर यांनी तिच्या यशाचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










