मंडणगड : प्रतिनिधी, दि. 6 – प्रीपेड मीटर, आंबेत पूल, नवीन जिल्हा निर्मिती, रस्त्यातील खड्डे आदि जनहिताच्या प्रश्नांबाबत सामाजिक कार्यकते राजेश गमरे यांनी स्वातंत्र्यदिनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात त्यांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी भेट घेवून निवेदन सादर केले.
निवेदनातील माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत खाडी पुलाचे शेजारी नवीन पुलाची निर्मिती करण्यात यावी, 14 जून 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या समितीचा अहवाल जाहीर करून रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड जिल्ह्याचे निर्मिती करीता जलदगतीने प्रयत्न करण्यात यावेत, राजेवाडी ते आंबडवे या महामार्गावरील मंडणगड शहरातील चौकात व मंडणगड तहसील कार्यालयासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे शासकीय निधीतून उभारण्यात यावेत, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंबडवे – राजेवाडी महामार्गावरील रस्त्यातील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत व उर्वरित काम वेगाने पूर्ण करावे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत बळजबरीने बसवण्यात येणारे प्रीपेड मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवण्यात यावे या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
जनहिताच्या असलेल्या या मागण्यांबाबत पत्रकार, राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांच्या मार्फत वेळोवेळी निवेदने व आंदोलने केली गेली आहेत, आम्ही सुद्धा उपरोक्त विषयासंदर्भात सातत्याने आंदोलने केली असताना सबंधित प्रशासनाकडून केवळ आश्वासने देण्यात आली असल्याचे व त्याकरिता 15 ऑगस्ट 2025 रोजी अन्नत्याग, उपोषण निर्णय घेतला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना राजेश साळवी, राजेश खैरे, प्रतिक गमरे, अरुण भोई आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो – तहसीलदार अक्षय ढाकणे यांना निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे व अन्य.










