नागरिकांच्या असलेल्या हरकती लक्षात घेऊन उचित कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांच्या सूचना
लांजा -: संतोष कोत्रे
नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता टंडन कंपनीने कार्यालयात बसून केलेल्या लांजा नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात नागरिकांच्या असलेल्या हरकती लक्षात घेऊन त्यावर उचित कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
दरम्यान दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता या प्रकारची सूचना दिल्याने लांजा नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आल्यानंतर सुरुवातीपासूनच या विकास आराखड्याला लांजा आणि कुवे येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. लोकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हा विकास आराखडा तयार करण्यात आल्याने २०० हून अधिक लोकांची घरे तुटणार असून त्यांच्या अन्य मालमत्तेचे देखील मोठे नुकसान होणार असल्याने या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी किंबहुना तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी लांजा आणि कुवे येथील नागरिकांतून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची देखील लांजा- कुवे बचाव समितीच्या वतीने भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतर लांजा कुवे बचाव समितीच्या शिष्टमंडळाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना देखील या विकास आराखड्यारा स्थगिती मिळावी याचे निवेदन सादर केले होते.
त्याचप्रमाणे विकास आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी उपोषण केले जाणार आहे. या साऱ्या घडामोडीत मत्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे त्याचप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले होते आणि लांजा नगरपंचायतीच्या वतीने लोकांवर लादण्यात आलेल्या विकास आराखड्याला तातडीने स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांजा शहराच्या विकास आराखड्याला लोकांचा असलेला विरोध लक्षात घेऊन तपासून कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अशा प्रकारची सूचना दिल्याने लांजा नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.











