काशीविश्वेश्वर मंदिराच्या हरिनाम सप्ताहाची सांगता…!

देखावे ठरले सप्ताहाचे आकर्षण : सप्ताहानिमित्त शहरात भक्तिमय वातावरण…!

कणकवली –श्री देव काशीविश्वेश्वर मंदिराच्या हरिनाम सप्ताहाची गुरुवारी नगरप्रदक्षिणेने सांगता झाली. सहाव्या दिवशी आंबेआळी मित्रमंडळाने काढलेला विराटरुपी कृष्णदर्शन तर बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळाने काढलेला अबजलखानाचा वध हे देखावे त्या रात्री लक्षवेधी ठरले. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने बाजारपेठेत जत्रेचे रूप दिसून आले.सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी महापुरुष मित्रमंडळाने काढलेला 20 फुटी बगळारुपी बकासुराचा वध हा देखावा या सप्ताहाचे विशेष आकर्षण ठरला.

काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारी ३१ जुलै रोजी उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला होता. या मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सप्ताहानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये दुपारनंतरच्या सत्रात रात्री पर्यंत विविध ठिकाणच्या नाचणाऱ्या भजनानींनी रंगत आणली. प्रत्येक दिवशी विविध मंडळांच्या वतीने चलचित्र देखावे काढण्यात आले. पहिल्या दिवशी तेलीआळी मित्र मंडळ यांनी चलचित्र देखावा काढत रात्र जागवली. दुसरा दिवस महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ यांनी देखावा काढून रात्र जागवली. तिसरा दिवस पटकीदेवी मित्रमंडळाने देखावा काढत रात्र जागवली. चौथा दिवस ढालकाठी मित्रमंडळाने चलचित्र देखावा काढत रात्र जागवली. पाचवा दिवस जुना मोटर स्टॅण्ड मारुतीआळी व बजलीनगर मित्रमंडळाने हा चलचित्र देखावे काढून रात्र जागवली. सहाव्या दिवशी आंबेआळी मित्रमंडळाने विराट कृष्णाचे दर्शन तर बाळ गोपाळ मित्रमंडळाने ऐतिहासिक अबजल खानाचा वध हा देखावा काढला. हे देखावे पाहण्यासाठी बाजारपेठेत जत्रेसारखी गर्दी झाली होती. गुरुवार सकाळी नगरप्रदक्षिणा झाली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता झाली.