कणकवलीत महाराणा प्रताप जयंती उत्साहात

शेकडो दुचाकीस्वारांची भव्य रॅली; भगवे फेटे, लाल पताका आणि घोषणांनी शहर दणाणले

कणकवली –
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह (राणे समाज) उत्सव समितीतर्फे कणकवली शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवे फेटे, लाल पताका, पारंपरिक वेशभूषा आणि जयघोषांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. शेकडो महिला, पुरुष आणि राणे समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही रॅली विशेष लक्षवेधी ठरली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी रवळनाथ मंदिर येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राणे समाज बांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

रॅलीचा शुभारंभ रवळनाथ मंदिर येथून करण्यात आला. त्यानंतर नवीन डीपी रोड, चौंडेश्वर मंदिर, टेंबवाडी, गांगो मंदिर, आप्पासाहेब पटवर्धन चौक मार्गे रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. येथे सहभागी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बाजारपेठ, ढालकाठी, पटकीदेवी मार्गे पुन्हा रवळनाथ मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

“वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. अनेक युवकांनी दुचाकींवर लाल पताका फडकवत तर पारंपरिक वेशभूषा आणि भगवे फेटे परिधान करून सहभाग नोंदवल्याने रॅलीचे आकर्षण अधिक वाढले.

यानंतर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर पूजा विधी पार पडला. सायंकाळी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “होम मिनिस्टर” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच दत्तप्रसादिक भजन मंडळ, बांधकरवाडी यांच्या सुश्राव्य भजनांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. रात्री सिंधुरत्न महिला दशावतार मंडळाचा “कालिका महात्म्य” हा नाट्यप्रयोग रंगला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. उपस्थितांनी तीर्थप्रसादाचाही लाभ घेतला.