राखी सजली.. आधुनिक झाली

 

स्टायलिश’ व ‘फॅशनेबल’ राख्यांची चलती : राखी सामाजिक संदेशही देणार

कणकवली (मयुर ठाकूर ) : भाऊ – बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन! यावर्षी रक्षाबंधन हा सण यावर्षी ‘स्टायलिश’ व फॅशनेबल राख्यांमुळे लाडक्या भावांना खास ठरणार आहे. पारंपरिक राख्यांच्या पुढे जात यावर्षी बाजारात डायमंड, कुंदन वर्क, चेन – ब्रेसलेट स्टाइल, तसेच मेटल, स्टोन व सिल्व्हर वर्क राख्या विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर मुलांना आकर्षित करणाऱ्या थ्रीडी, साऊंड आणि लायटिंग असणाऱ्या राख्यांनाही बाजारात मोठी मागणी आहे. रक्षाबंधनाला अवघे दोन दिवस बाकी आहेत. यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठेतील अनेक राख्यांची दुकाने सजली आहेत. दुकानांमध्ये राखी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात भगिनींचा वावर दिसून येत आहेत.

बाजारपेठा सजल्या विविध प्रकारच्या राख्यांनी! ( बॉक्स )

शहरातील दुकाने विविध प्रकारच्या राख्यांनी सजली आहेत. ठिकठिकाणी लहान स्टॉल्स, हातगाडीवर आकर्षक राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

डायमंड, स्टोनवर्क, मेटल, सिल्व्हर वर्कच्या राख्या!

महिलांसाठी खास बनवलेल्या ज्वेलरी लूक राख्या यंदा हिट ठरत आहेत. ब्रेसलेट, अंगठी स्टाइल, अमेरिकन डायमंड आणि कुंदन वर्क असलेल्या राख्या खास सजावटीत उपलब्ध आहेत. काही राख्यांचा भाव ३०० ते अगदी १००० रुपयांपर्यंत आहे. त्यातच लहान मुलांच्या आवडीचे कार्टून पात्र असलेल्या राख्यांचीही चलती आहे. त्यात थ्रीडी प्रिंट, लायटिंग व म्युझिक राख्या अधिक लोकप्रिय आहेत. काही राख्यांमध्ये ‘आवाज’ व ‘गाणी’ सुद्धा आहेत.

क्रिएटिव्ह राख्यांचेही नवीन आकर्षण!

अहिंसा संदेश, पर्यावरण रक्षण, झाडे लावा, बंधुभाव यासारख्या सामाजिक संकल्पनांवर आधारित थीम राख्या यंदा नवलाई ठरत आहेत. मोठ्या शहरात या राख्या उपलब्ध आहेत. तर हाताने बनवलेल्या राख्यांनाही पसंती मिळतेय.

यावर्षी राख्यांच्या किंमतीत वाढ!

कच्चा माल, सजावटीच्या साहित्याच्या महागाईचा फटका राख्यांनाही बसला आहे. परिणामी, यंदा प्रत्येक श्रेणीतील राख्यांमध्ये ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

————————–

रक्षाबंधनाचा सण स्पेशल बनविण्यासाठी यावर्षी ग्राहक जास्त फॅशनेबल आणि डिझायनर राख्या शोधत आहेत. ज्वेलरी लूक राख्यांना महिलांचा खास प्रतिसाद असून, यावर्षी काही प्रमाणात राख्यांच्या किंमती देखील वाढल्या आहेत.