कणकवली लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. दिवाकर मुरकर; नवीन कार्यकारिणी जाहीर

५ जुलै रोजी होणार पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा

 

 

कणकवली : कणकवली लायन्स क्लबच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये वर्ष २०२६-२७ साठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. दिवाकर मुरकर यांची अध्यक्षपदी, तर डॉ. अशोक कदम यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी डॉ. प्रवीण गोरुळे, प्रथम उपाध्यक्षपदी विजय पोवार आणि द्वितीय उपाध्यक्षपदी नंदू सावंत यांची निवड करण्यात आली.

लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रवीण बिरमोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट डॉ. बाळकृष्ण महाडेश्वर, ज्येष्ठ लायन सदस्य शामसुंदर महाडेश्वर, महेश काणेकर, विलास बुचडे तसेच डॉ. शमीता बिरमोळे उपस्थित होत्या.

प्रा. दिवाकर मुरकर हे गेली दोन वर्षे क्लबचे सचिव म्हणून कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून ते विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. सध्या ते मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते कणकवली नगरपंचायतीचे माजी स्वीकृत नगरसेवक राहिले आहेत. त्यांच्या व्यापक जनसंपर्काचा आणि सामाजिक अनुभवाचा लाभ लायन्स क्लबच्या आगामी वाटचालीस होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी डॉ. प्रवीण बिरमोळे यांच्या गुरुकृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

प्रा. दिवाकर मुरकर यांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.