राजापूर (वार्ताहर): हर हर महादेव राजापूर संघटनेमार्फत प्रतिवर्षाप्रमाणे राजापूर ते कुणकेश्वर दर्शन पदयात्रा कार्यक्रम दोन ते चार ऑगस्ट या दरम्यान मोठया उत्साहात संपन्न झाला. सलग अकरा वर्षे ही पदयात्रा चालू आहे.
यंदाच्या पदयात्रेचा प्रारंभही जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ अरू बावधनकर व राजापूर तालुका ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष उल्हास खडपे यांनी पुष्पहार अर्पण केला.
ही दर्शन पदयात्रा राजापूर जवाहर चौक, कोंडेतढ, डोंगर, सागवे शिरसे, वाडा, देवगड मार्गे कुणकेशवर अशा मार्गे झाली. हा प्रवास सुमारे ६० ते ६५ किलोमीटरचा होता. या पदयात्रेत पुरूषांप्रमाणेच महिलाही मोठया प्रमाणात सहभागी होत्या. सुमारे ८० ते ९० पदयात्री सहभागी झाले होते. सर्व पदयात्रींना टी शर्ट तसेच सदरा पायजमा असा आकर्षक पोषाख देण्यात आला होता. तसेच सकाळचा फराळ मणचेकर यांनी तर दुपारच्या फराळाची सोय नाणार येथील राम पेडणेकर यांच्या निवास्थानी करण्यात आली होती. संध्याकाळी वाडा येथील श्रीदेव रवळनाथ मंदिरात मुक्कामाच्या ठिकाणी भोजन व्यवस्था परब गावकार व पप्या वाडेकर यांनी तर कुणकेश्वर येथे भोजन व्यवस्था राकेश तेली यांनी केली.
या पदयात्रेसाठी राजापूर तालुका, रत्नागिरी व मुंबई येथील पदयात्री सामील झाले होते. श्रीदेव कुणकेश्वर देवस्थानच्या वतीने सन्मानपत्र शाल, श्रीफळ देवून संघटनेचा सत्कार करण्यात आला व त्या दिवसाचा मानाच्या पूजेचा मान संघटनेला देण्यात आला. गेली पाच वर्षे पदयात्रेचे मोफत लाईव्ह प्रक्षेपण करणारे जगन्नाथ गुरव यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सारा वॉटर सप्लायचे सुभाष चव्हाण यांनी मोफत पाणी वाटप केले. तसेच वाहन व्यवस्था सागर रहाटे व पर्शुराम खंडे यांनी केली. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.












