माणुसकी आणि बंधुभावाचा अनोखा संदेश
सावंतवाडी । प्रतिनिधी : कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडीच्या सातवीतील विद्यार्थिनींनी यंदाचा रक्षाबंधनाचा सण एका वेगळ्याच सामाजिक जाणिवेतून साजरा केला. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेच्या दृष्टीहीन लाभार्थ्यांना राख्या बांधून त्यांनी माणुसकी आणि बंधुभावाचा संदेश दिला.
या कार्यक्रमात नॅबचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी संस्थेची आणि त्यांच्या नेत्र रुग्णालयाची माहिती दिली. ते म्हणाले की, रुग्णालयात डोळ्यांची तपासणी विनामूल्य केली जाते, तर शस्त्रक्रिया अत्यंत कमी खर्चात उपलब्ध आहे. आधुनिक यंत्रणा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर आणि अनुभवी डॉक्टरांच्या मदतीने या शस्त्रक्रिया केल्या जातात, असे त्यांनी सांगितले. गरजू रुग्णांना या सेवेची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी मोबाईलचा कमी वापर करून मैदानी खेळांवर भर देण्याचा सल्ला दिला. ‘भरपूर खेळा, योगा करा आणि मन लावून अभ्यास करून यशाचे शिखर गाठा,’ असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
यावेळी नॅबचे सचिव सोमनाथ जिनी, कोषाध्यक्ष डॉ. विनया बाड, रो. सुहास सातोस्कर, पी. वी. बागुल आणि वैष्णवी सावंत उपस्थित होते. तसेच, बाबूराव गावडे, समीर नाईक आणि शिर्के यांसारखे दृष्टीहीन लाभार्थीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या विद्यार्थिनींनी सर्व दृष्टीहीन बांधवांना औक्षण करून राख्या बांधल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमाने रक्षाबंधनाचा सण अधिक अर्थपूर्ण बनला.












