एसटीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रस्त्यालगत असलेल्या फॅब्रिकेशनच्या गेटला धडकल्याने अपघात

कोलगाव जूनानाका येथील अपघातात दुर्दैवी घटना

बस चालकासह फॅब्रिकेशन मालकावर गुन्हा दाखल

सावंतवाडी : सावंतवाडी येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुन्या मुंबई गोवा महामार्गावर कोलगाव जूनानाका येथे घडली. रुपेश अनिल पाटकर (३३, सध्या रा. पिंगुळी ता. कुडाळ, मूळ माजगांव नाला – कुंभारवाडी ) असे त्याचे नाव आहे. रस्त्यालगत असलेल्या फेब्रिकेशनच्या लोखंडी गेटला धडकल्याने तो रस्त्यावर फेकला गेला याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडून त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालकासह संबंधित फॅब्रिकेशन मालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुपेश पाटकर याची व्ही गार्ड या इलेक्ट्रॉनिक कंपनीची एजन्सी होती. सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एजन्सीचे काम तो सांभाळत होता. शुक्रवारी सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथे सर्व्हिस देण्यासाठी तो आला होता. तिथून पिंगुळी येथे परत जात असताना कोलगांव आयटीआय समोरील अंबिका फेब्रिकेशनच्या गेटला त्याच्या पॅशन दुचाकीची जोरदार धडक बसली त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला. याच वेळी पाठीमागून वेगात येणाऱ्या सावंतवाडी डेपोच्या सावंतवाडी कणकवली या एसटी बस ( एम एच २० बीएल २११४ ) च्या पुढील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच दुदैर्वी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस बीट अंमलदार हनुमंत धोत्रे, पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली. ट्राफिक जामची समस्या उद्भवत असल्याने पोलिसांनी त्वरित पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला मात्र अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मृत रुपेशच्या भावांसह माजगांव ग्रामस्थांनी फॅब्रिकेशनचा गेट उघडा असल्यानेच अपघात होऊन सदर युवकाचा हकनाक बळी गेल्याचा आरोप करीत सदर फेब्रिकेशन मालकावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त व आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडेही तीच मागणी लावून धरली. यावेळी रिचर्ड डिमेलो, क्लॅटस फर्नांडीस, राजू कुबल, जीजी कानसे, बाळा वेजरे, बाबू सावंत, सचिन पाटकर, राजन पाटकर आदी उपस्थित होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित अपघातग्रस्त सावंतवाडी कणकवली एसटी बसचा चालक कुणाल हनुमंत सातार्डेकर ( ४०, रा. मोरगांव, ता. दोडामार्ग ) तसेच अंबिका फॅब्रिकेशनचे मालक रमेश गजानन केनवडेकर ( वय अंदाजे ५०, रा. कोलगांव ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबतची खबर मृत रुपेश चा भाऊ सचिन अनिल पाटकर याने सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. अपघातानंतर घटनास्थळी सावंतवाडी एसटी बसचे आगार व्यवस्थापक निलेश गावीत यांनी भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली.
मृत रुपेश पाटकर याच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. विवाहनंतर तो कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे पत्नीसह वास्तव्यास होता. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याच्या दुर्दैवी निधनाबद्दल माजगाव तसेच पिंगुळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.