सर्पमित्र केदार हडकर यांच्याकडून साडेचार फुटी अजगराला जीवदान

अजगरास सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले

आचरा प्रतिनिधी :
चिंदर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष गांवकर यांच्या काजू बागेत सुमारे साडेचार फूट लांबीचा अजगर आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच हडी येथील सर्पमित्र केदार हडकर यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे पकडून त्याचे प्राण वाचवले. काजू बागेत अजगर आढळल्याने परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान राखत सर्पमित्र केदार हडकर यांनी अत्यंत सावधगिरीने अजगराला पकडले. त्यानंतर कोणतीही इजा न होता त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. त्यांच्या या तत्परतेमुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचण्यास मदत झाली.

या वेळी संतोष गांवकर, एकनाथ पवार, बाबू परब, गिरीश भावे, हर्षदा परब, नम्रता परब, गणेश आचरेकर, बाळा मुणगेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, साप किंवा अन्य वन्यजीव आढळल्यास घाबरून जाऊन त्यांना मारण्याचा अथवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. वन्यजीवांना इजा न करता तातडीने प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र केदार हडकर यांनी केले.