धामणी प्रकल्प कालवा तीरावरील घरांची पडझड

कालवा खोदकामातील भूसुरुंगाचा परिणाम, मांडवकरवाडी ग्रामस्थांचा आरोप, नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी.

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर – राई (ता.राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची खुदाई करताना ठेकेदार कंपनीने खडक फोडण्यासाठी शक्तिशाली भूसुरुंगाचे स्फोट केले होते. त्यावेळी कालव्याच्या काठावर वसलेल्या मांडवकरवाडीतील काही घरांना तडे जाऊन भेगा पडलेल्या होत्या.परिणामी सध्याच्या पावसाने तडे गेलेल्या चार घरांच्या भिंती खचून पडझड झाल्याने ग्रामस्थांतून भीती व्यक्त होत आहे.तरी प्रशासनाने पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई देऊन कालव्यात बाधित होणाऱ्या घरांचे योग्यरित्या पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील धामणी खोऱ्यात हरित क्रांती घडवणारा बहूचर्चित धामणी प्रकल्प गेल्या पंचवीस वर्षापासून एक ना अनेक कारणाने अडचणीत आला होता.मात्र गेल्या दोन वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरु असून सध्या प्रकल्पात प्रथमच दिड टीएमसी पाणी साठवणूक करण्यात आली आहे.धामणी नदीवरील सदर प्रकल्पाच्या पश्चिमेकडील डाव्या कालव्याच्या माध्यमातून प्रकल्पातील अतिरिक्त पाणी नजीकच्या हरप नदी पात्रात सोडण्यात आले आहे.त्यामुळे गेल्या एक वर्षापासून संबंधित ठेकेदार कंपनीकडून हरप नदीचे रुंदीकरण करून कालव्यात रूपांतर सुरू आहे.मात्र नदीचे रुंदीकरण करताना ठेकेदार कंपनीकडून खुदाई करीता मोठ्या भूसुरुंगाचे स्फोट घडून आणल्यानेच सदर कालव्याच्या काठावरील मांडवकरवाडी येथील काही घरांना तडे गेल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

सध्या पावसाने बाळू मांडवकर, वासू कदम, लहू मांडवकर, गणपती मांडवकर यांच्या घरांची पडझड झाली असून वादळ व पाऊस असाच सुरू राहिल्यास इतर घरांचेही नुकसान होण्याची भीती ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.तसेच कालवा खुदाई करताना मांडवकरवाडी गावाजवळ ११० मीटर ऐवजी ६० मीटरने रुंदी केली आहे.तर कालव्याच्या वरील व खालील बाजूला एकशे दहा मीटरने रुंदी केली आहे.त्यामुळे मांडवकरवाडीला धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर भविष्यात प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हरप नदीच्या कालवा पात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे.परिणामी पुराचे पाणी थेट मांडवकरवाडीत घुसून धोका होण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करत आहे. तरी शासनाने मांडवकरवाडी येथील कालव्याचे पूर्ण क्षमतेने रुंदीकरण करण्याबरोबर बाधित होणाऱ्या घरांची योग्य पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

कोट – आमच्या जीवाशी खेळू नका..!
धामणी प्रकल्प पूर्ण व्हावा ही आमची इच्छा होती म्हणून आम्ही पण कालवा खुदाई करताना कोणतीच अडचण आणली नाही. मात्र ठेकेदार कंपनीने ब्लास्टिंग लावून आमच्या घरांचे नुकसान केले आहे.त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. तरी संबंधितांनी आमच्या जीवाशी खेळू नये.आमचे योग्य ते पुनर्वसन करून,घरांची नुकसान भरपाई मिळावी हीच शासनाकडे मागणी आहे.
– बाळू मांडवकर,
ग्रामस्थ,मांडवकरवाडी

कोट – धामणी धरण पूर्ण व्हावं म्हणून जीवाचं रान करून आम्ही जमिनीचा त्याग केला. पण ज्या घरात आम्ही राहतोय तेच नेमकं घर कॅनॉल मध्ये काठावर ठेवलंय. हरप नदी डोंगरातून वाहत येते आणि याचं कॅनॉलला मिळते. नदीचा प्रवाह एवढा मोठा आहे की काठावरील घरे आरण्याची शक्यता आहे. काही अंशी जमीन आरायला सुरुवात झालीय, नदीतुन ४ ते ५ फूट दगड, वाळू, रेतीने भरून आली आहे. त्यामुळे आमच्या घराच्या बाजूला ६० मीटरने खोदकाम करून धोका करून ठेवलाय. ११० मीटरचा जसा सर्वे होता तो अगदी बरोबर होता. याचा गांभीर्याने विचार करून कमीत कमी काठावरील घरांचे पुनर्वसन व्हावे. घरांचे आयुष्यमान कमी होऊन पडत आली असून गेल्या पावसाळ्यात पुनर्वसन झालं नाही. कमीत कमी दुर्घटना घडायच्या आत या वर्षी तरी पुनर्वसन करावे.

वासू कदम, ग्रामस्थ