भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी सैनिकांना पाठवल्या १ हजार राख्या
सावंतवाडी | प्रतिनिधी:रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने देशाची सीमेवर अहोरात्र सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सावंतवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी सीमेवरील सैनिकांसाठी तब्बल १ हजार राख्या पोस्टाच्या माध्यमातून पाठवून त्यांच्याशी बंधुत्वाचे नाते जोडले आहे.
आपले सण, उत्सव आणि दैनंदिन जीवन सुरक्षित राहावे यासाठी सैनिक आपल्या घरापासून दूर, प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करतात. त्यांच्या या अतुलनीय योगदानाला सलाम करत भाजपच्या महिला पदाधिकारी पुढे आल्या. त्यांनी मोठ्या उत्साहात आणि आपुलकीने या राख्या तयार करून पॅक केल्या. हा केवळ एक धागा नसून, तो प्रत्येक भारतीय बहिणीच्या मनात सैनिकांप्रती असलेल्या आदर, प्रेम आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे.
या उपक्रमामुळे सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना आपण एकटे नाही, तर संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याची जाणीव होईल. अशा विधायक आणि भावनिक उपक्रमातून देशाप्रती समर्पण, बंधुभाव आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होते. याप्रसंगी सावंतवाडी भाजपच्या महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्यासह माजी नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप पदाधिकारी मेघना साळगावकर, मिसबा शेख, मेघा भोगटे, सविता टोपले, तृप्ती विरनोडकर आणि बीरोडकर आदी उपस्थित होत्या.
या उपक्रमाने समाजासमोर एक आदर्श ठेवला असून, सैनिकांच्या बलिदानाला मान देणारी ही कृती खऱ्या अर्थाने देशभक्तीची साक्ष देत आहे.










