१७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्हमध्ये गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी :
गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला राज्यस्तरीय ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथील कोरिंथियन्स रिसॉर्टमध्ये ८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात शाळेचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संपूर्ण राज्यभरातून प्राप्त झालेल्या ५०० हून अधिक नामांकनांमधून निकषांची कडक पाहणी करून यशवंतराव भोसले सैनिक स्कूलची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मिमांसा हे ‘मिमांसा एज्युकेटर्स’ यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. शिक्षक, शाळा, शैक्षणिक संस्था आणि या क्षेत्रातील नेतृत्वाला एकत्र आणणे, शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणे तसेच उत्कृष्ट कार्याचा गौरव करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
विविध शैक्षणिक उपक्रम आणि शिस्तबद्ध विद्यार्थी विकासाच्या माध्यमातून शाळेने केलेल्या कामगिरीची दखल घेतल्याने या सन्मानामुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत भोसले आणि सचिव संजीव देसाई यांनी शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी उज्वल शुभेच्छा दिल्या आहेत.












