सचिवपदी ॲड. संतोष सावंत तर कोषाध्यक्षपदी अनंत वैद्य
कुडाळ । प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष मंगेश मस्के यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या या निवड प्रक्रियेत जिल्हा सचिवपदी सावंतवाडीचे ॲड. संतोष सावंत, कोषाध्यक्षपदी अनंत वैद्य, जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजारिओ पिंटो आणि सहकार्यवाह म्हणून सुरेश पवार यांचीही निवड करण्यात आली.
मंगेश मस्के यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांनी विशेषतः या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. कर्णिक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेचे काम उत्तम असल्याचे सांगून, ही निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीला साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध समित्यांच्या प्रमुखपदीही सदस्यांची निवड करण्यात आली. यात महिला साहित्य संमेलनासाठी सौ. वृंदा कांबळी, जिल्हा साहित्य संमेलनासाठी विठ्ठल कदम, जनसंपर्कासाठी भरत गावडे, ग्रंथ निवड पुरस्कार समितीसाठी पत्रकार अभिमन्यू लोंढे, सामाजिक कार्यासाठी रणजीत देसाई, प्रिंट मीडियासाठी पत्रकार गणेश जेठे, विधी व कायद्यासाठी ॲड. अमोल सामंत, लेखापरीक्षणासाठी केशव फाटक आणि सोशल मीडियासाठी पत्रकार निलेश जोशी यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेत माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून शांततेत प्रक्रिया पार पाडली. निवडीनंतर बोलताना, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनी सर्वांच्या सहकार्यामुळेच पुन्हा संधी मिळाल्याचे सांगितले आणि संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना अपेक्षित असलेले काम निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले.
या निवड प्रक्रियेवेळी प्रा. संतोष वालावलकर, सुरेश ठाकूर, माधव कदम, संदीप वालावलकर, दीपक पटेकर, चिराग बांदेकर, सौ. उषा परब, सौ. दिपाली काजरेकर, प्रा. सुभाष गोवेकर, नकुल पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील, बंड्या जोशी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सचिव विठ्ठल कदम आणि खजिनदार भरत गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.











