भाजपतर्फे रक्षाबंधन उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी – रक्षाबंधनाच्या निमित्ताने रत्नागिरी शहरातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हजारो राख्या पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजप शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी दिली. शहरातील विविध भागांतील महिला, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने राबविलेल्या योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत. त्या आपल्या हातून लिहिलेल्या धन्यवाद पत्रासह “देवा भाऊ” यांच्यासाठी राखी पाठवत आहेत.
महिलांना लाभ मिळालेल्या योजनांमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना, बेबी केअर किट योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण १००% मोफत योजना, जल जीवन मिशन, आयुष्यमान भारत योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे.
भाजप कार्यकर्ते हा उपक्रम राबवित असून, प्रभाग क्रमांक ६ मधून आतापर्यंत शेकडो राख्या जमा झाल्या आहेत. रत्नागिरी शहरातून हजारो राख्या पाठविण्याचे लक्ष्य ठेवले असून, या अभियानाला शहर व जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हा कार्यक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, कोकण विभाग प्रदेश पदाधिकारी शिल्पा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली; तर जिल्ह्यात सौ. मृणाल खेडेकर, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली राबविला जात आहे. शहरात दादा ढेकणे आणि महिला मोर्चा शहराध्यक्ष पल्लवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम सुरू आहे.
अभियान १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, अजूनही ज्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी राखी पाठवायची असेल त्यांनी भाजप पदाधिकारी किंवा भाजप जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष नितीन जाधव आणि माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.











