पोंभुर्ले येथे शाश्वत शेती दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षण

नाचणी लागवड तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

शिरगाव (प्रतिनिधी) :देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे तालुकास्तरीय शाश्वत शेती दिन तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान – अन्नधान्य पिके (सन २०२५-२६) अंतर्गत नाचणी लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवर व शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात मंडळ कृषी अधिकारी (वाडा) श्री. संभाजी जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी (देवगड) श्रीमती आरती पाटील यांनी शाश्वत शेती दिनाचे महत्त्व आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या हरितक्रांतीतील योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी (शिरगाव) डॉ. बापूसाहेब लांबाडे यांनी शाश्वत शेती पद्धती व नाचणी लागवड तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी पोंभुर्ले सरपंच सौ. प्रियांका धावडे यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (देवगड) श्री. निकेतन राणे यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी (पोंभुर्ले) श्री. स्वप्निल तेली यांनी केले.

यावेळी पोंभुर्ले सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच श्री. सादिक डोंगरकर, तालुका कृषी अधिकारी देवगड श्रीमती आरती पाटील, मंडळ कृषी अधिकारी शिरगाव डॉ. बापूसाहेब लांबाडे, मंडळ कृषी अधिकारी वाडा श्री. संभाजी जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक देवगड श्री. निकेतन राणे, यूएनडीपी प्रकल्प समन्वयक सौ. दीपिका रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी सौ.स्वाती घाटग्यानावर, सहाय्यक कृषी अधिकारी पोंभुर्ले श्री. स्वप्निल तेली, आम्रधन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सचिव श्री. जलाल डोंगरकर तसेच गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.