गोवंश वाहतूक प्रकरणातील बैलांचा ताबा गोशाळेकडेच

गोहत्येच्या उद्देशाने वाहतूक प्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

गोशाळेला दरमहा खावटी खर्च देण्याचेही आदेश

सिंधुदुर्ग : गोहत्येच्या उद्देशाने बैलांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आरोपी मनोज मंगेश सावंत यांचा बैल ताब्यात देण्याचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने बैलांचा ताबा ध्यान फाउंडेशनच्या गोशाळेकडेच ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर आरोपीला प्रत्येक बैलासाठी दरमहा ३ हजार रुपये खावटी (चारा-पाणी) खर्च देण्याचेही न्यायालयाने बजावले आहे. बजरंग दल आणि ध्यान फाउंडेशनच्या गोरक्षण कार्याला यामुळे मोठे यश मिळाले असून, हा निकाल जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर १४ / २०२५ अंतर्गत मनोज मंगेश सावंत (रा. आकेरी, सावंत बागवेवाडी, ता. कुडाळ) याच्यावर कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तीन बैलांना ताब्यात घेतले होते. यानंतर आरोपी मनोज सावंत याने सावंतवाडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून हे बैल आपल्या ताब्यात मिळावेत अशी मागणी केली होती. न्यायालयाने मनोज सावंत यांचा अर्ज मंजूर केला होता, परंतु काही अटी आणि खावटीचा खर्च लावून बैल त्याच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला होता.
जिल्हा न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज
सावंतवाडी न्यायालयाच्या या आदेशाविरोधात ध्यान फाउंडेशन गोशाळेतर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्यात आला. या प्रकरणात ध्यान फाउंडेशनच्या वतीने मालवण येथील वकील श्री पलाश लीलाधर चव्हाण आणि वकील श्री आशिष वर्मा यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी पुराव्यांसह आणि कायद्याच्या आधारे आपली बाजू मांडली.

न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने ध्यान फाउंडेशनच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. पुराव्यांची आणि कायदेशीर बाजूंची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने ध्यान फाउंडेशनचा पुनर्विलोकन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे सावंतवाडी न्यायालयाचा जुना आदेश रद्द झाला. न्यायालयाने आरोपी मनोज सावंत यांना प्रत्येक बैलासाठी दरमहा ३ हजार रुपये खावटी खर्च देण्याचे निर्देश दिले असून, बैलांचा ताबा सरसोली धाम गोशाळेकडेच ठेवण्याचा आदेश दिला.
हा निकाल बजरंग दल आणि ध्यान फाउंडेशनच्या गोरक्षण कार्यासाठी एक मोठा विजय मानला जात आहे. या विजयामुळे बैलांचे प्राण वाचले असून, भविष्यात अशा प्रकरणांमध्ये हा निकाल एक महत्त्वपूर्ण उदाहरण ठरेल असे म्हटले जात आहे.
या लढ्यात सिनीअर वकील श्री. राजू गुप्ता, श्री. सचिन झुंजारराव, वकील श्री. पलाश चव्हाण, वकील श्री. आशिष वर्मा आणि वकील शिवानी दुगम यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.