रत्नागिरीत ‘स्वरभास्कर बैठक’ उपक्रमाचे पंधरावे वर्ष

रविवार, 17 ऑगस्ट रोजी माधवराव मुळ्ये सभागृहात आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरीतील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने 2011 साली सुरू झालेल्या ‘स्वरभास्कर बैठक’ उपक्रमाचे यावर्षी पंधरावे वर्ष आहे. होतकरू तरुण कलाकारांचे सादरीकरण आणि ज्येष्ठ, तपस्वी कलाकारांचे मार्गदर्शनपर सादरीकरण अशी या उपक्रमाची परंपरा आहे.

या वर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात ओजस करकरे यांच्या संवादिनी एकल वादनाने होणार असून त्यानंतर तन्वी मोरे शास्त्रीय गायन सादर करणार आहे. तन्वीला मंगेश मोरे (संवादिनी) आणि स्वरूप नेने (तबला) साथ देतील. ओजस करकरे यांनाही तबल्यावर स्वरूप नेने साथ करतील.

तन्वी मोरे यांच्या सादरीकरणानंतर उदय गोखले यांचे व्हायोलिन एकल वादन होईल. त्यांना प्रथमेश शहाणे तबला साथ करतील. कार्यक्रमाचा समारोप जयपूर अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकार पं. प्रसाद गुळवणी यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना चैतन्य पटवर्धन (संवादिनी) आणि हेरंब जोगळेकर (तबला) साथ करतील.

कार्यक्रम रविवार, 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत माधवराव मुळ्ये सभागृह, झाडगाव येथे होणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक आर्ट सर्कलतर्फे करण्यात आले आहे.