विविध राजकीय व सामाजिक संघटनांची मागणी
दहावी व बारावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला ध्वजारोहणाचा मान
ठाणे । प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गावातील राजकीय कलह टाळण्यासाठी एक अनोखा ‘भादाणे पॅटर्न’ सुरू करण्यात आला आहे. या पॅटर्ननुसार, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण दहावी आणि बारावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि त्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी शैक्षणिक स्पर्धेची भावना निर्माण झाली आहे. आता हा पॅटर्न राज्यभर लागू करावा अशी मागणी विविध सामाजिय संघटनांकडून होत आहे.
तत्कालीन सरपंच आणि शाळा समितीचे अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी १५ ऑगस्ट २०१५ रोजी या उपक्रमाची सुरुवात केली. गावाच्या ग्रामसभा आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्याध्यापक राजाराम कंटे यांनी मोलाची मदत केली. या उपक्रमामुळे गावातील राजकीय भांडणे थांबली आणि एक सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार झाले. आतापर्यंत भादाणे गावातील २० विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत ध्वजारोहणाचा मान मिळवला आहे.
*देशभरात कौतुक आणि मागणी*
भादाणे पॅटर्नचे कौतुक केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात होत आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी हा पॅटर्न राज्यभर लागू करण्याची मागणी केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या पॅटर्नचे कौतुक करण्यात आले आणि तो राज्यात लागू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठराव पाठवण्यात आला आहे.
या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारनेही त्याची दखल घेतली आहे. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री आशिष पटेल यांनी संजय हांडोरे पाटील यांना लखनौ येथे आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले आहे. हे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.









