खेड नगरपरिषदेची घरोघरी ‘ डास प्रतिबंधक फवारणी

खेड(प्रतिनिधी) खेड शहरात डेंग्यू साथीचा फैलाव उद्भवू नये, याकरिता सतर्क झालेल्या नगरपरिषदेने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी केली. यापाठोपाठच गेल्या काही दिवसांपासून नगरप्रशासनाने  घरोघरी डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती निर्माण होवून डेंग्यूची साथ डोके वर काढू शकते. अशा भागांवर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
याशिवाय शहरातील मोक्याच्या ठिकाणी व डोअर टू डोअर डास प्रतिबंधक फवारणी केली जात आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे जगबुडीच्या पुराचे पाणी मटण-मच्छी मार्केटमध्ये घुसले होते. यामुळे याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहित धरत मटण-मच्छी मार्केट नगरप्रशासनाने परिसरातही डास प्रतिबंधक फवारणी केली.
विशेषत: साठे मोहल्ला, पोत्रिक मोहल्ला परिसरात डेंग्यू साथीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. यामुळे याठिकाणी डोअर टू डोअर डास प्रतिबंधक फवारणी करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. ही मोहीम आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचे नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांनी सांगितले.