१५ ऑगस्ट रोजीचे उपोषण न भूतो न भविष्यती करणार लांजा- कुवे बचाव समिती आणि नागरिकांचा एकमुखी निर्धार

संतोष कोत्रे
‌. लांजा -: कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता लांजा प्रारूप विकास आराखड्या (बिपीन) विरोधात १५ ऑगस्ट रोजी छेडण्यात आलेले उपोषण न भूतो न भविष्यती करण्याचा एकमुखी निर्धार रविवारी लांजा येथे पार पडलेला बैठकीत लांजा- कुवे बचाव समिती आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आला. तसेच जोपर्यंत डीपीला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आपला विरोध कायम चालू ठेवण्याचे देखील यावेळी ठरवण्यात आले.
हे उपोषण होऊ नये किंवा त्यात फूट पडावी म्हणून काहीजण वेगवेगळी प्रलोभने दाखवत आहेत. डीपी मध्ये बदल केला जाईल,असेही काहीजणांकडून जाणीवपूर्वक सांगितले जात आहे .मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखडा (डीपी) ला लांजा आणि कुवे येथील नागरिकांनी कडाडून विरोध केलेला आहे.आणि याच अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने बैठका, मंत्री, खासदार आमदार यांना निवेदन सादर करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे प्रारुप विकास आराखडा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत त्या विरोधात एकमुखी व ठामपणे लढण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.. विकास आराखड्या संदर्भातील नागरिकांनी दिलेल्या १५०० हरकतींवर दिनांक ४ ते ७ ऑगस्ट या कालावधीत सुनावणी झाली आहे. मात्र ही सुनावणी म्हणजे केवळ नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त भावना लांजा आणि कुवे येथील नागरिकांतून व्यक्त होत आहेत .
याच पार्श्वभूमीवर विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले असून त्या संदर्भातील बैठक रविवारी लांजा शहरातील चव्हाटा मंदिर या ठिकाणी पार पडली. या बैठकीत जोपर्यंत शहर विकास आराखड्याला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत त्या विरोधातील लढा हा कायम चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. काही लोकांकडून नागरिकांना प्रलोभने दाखवली जात आहेत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे डीपी प्लॅन मध्ये बदल केले जातील असे देखील जाणीवपूर्वक भासवण्याचा किंवा लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा प्रकारच्या खोट्या भुलथापांना कोणीही बळी पडू नये. खरोखर जर बदल होणार असतील तर प्रशासनाने तसे लेखी स्वरूपात द्यावे, अशी देखील ठरवण्यात आले.
नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी झाली असली तरी प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित असलेल्या कोणत्याही प्रकारचे बदल हे होणार नाहीत. आणि म्हणूनच हा डीपी प्लॅन अर्थात विकास आराखडा रद्द करण्यात यावा किंवा त्याला स्थगिती मिळावी यासाठी १५ ऑगस्ट रोजी छेडलेले उपोषण हे न भूतो न भविष्यती करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. लांजा आणि कुवे येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी होऊन आपला विरोध दर्शवा.या उपोषणाची दखल सरकारला घेणे भाग पडेल, अशा ताकतीचे उपोषण करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला .
या बैठकीला लांजा कुवे बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि लांजा आणि कुवे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट- या विकास आराखड्यात काहींनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. काहींनी तर लांजा, रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी फ्लॅट देखील घेतले आहेत.काही जमीनी देखील विकत घेतल्या
आहेत. त्यामुळे ज्या कोणाला हा विकास आराखडा हवा असेल त्यांनी या विकास आराखड्यासाठी आपल्या जमिनी द्याव्यात,. मात्र आमच्या पूर्वजांनी जमिनी आमच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. त्या अशा प्रकारे मातीमोल होऊ न देण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.