राजापूर (वार्ताहर): अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध साऱ्यांना लागले आहेत. घरा घरात साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवाची लगबग घरोघरी आणि गणेशमूर्ती शाळांतही सुरू झाली आहे. गणपती मुर्ती काम आता अंतीम टप्यात आले असून मुर्त्यांचे रंगकाम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
यावर्षी बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्याने राजापूर शहरासह तालुक्यातील गणेश चित्रशाळा आता गजबजून गेल्या आहेत. शहरातील तांबट, रहाटे, कोठारकर, मांडवकर, कडू, यांच्या मूर्तीशाळांत एकच लगबग सुरू झाली आहे. सर्वसाधारणपणे जून जुलै पासून सुरू झालेली लगबग आता अंतीम टप्यात आली आहे. शहरातील धोपेश्वरघाटी येथील मूर्तीकार निलेश रहाटे यांच्या मुर्तीशाळेला भेट दिली असता नव्व्द टक्के काम मार्गी लागले आहे. तर वरचीपेठ येथील मुर्तीकार तांबट बंधु यांच्या मुर्तीशाळेतही युध्दपातळीवर काम सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
निलेश रहाटे हे युवा मुर्तीकार असून ते आपल्या वडिलांकडून आलेला मुर्तिकलेचा वारसा जपताना पाहायला मिळत आहेत. शाडू मुर्तीपासून स्वच्छ, सुबक पर्यावरण पुरक गणेश मुर्ती ही त्यांची ओळख असून त्यांनी ती आजही जपली आहे. या मुर्तीशाळेत नव्वद टक्के मुर्त्यांचे काम मार्गी लागले आहे.
तर तांबट कुटुंबिय गेली अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायात आता तीसरी पिढी कार्यरत आहे. मुर्तीवर रेखीवपणा व रंगकामातील कौशल्यामुळे त्यांच्याकडील मूर्तीना गणेश भक्तांची मोठी मागणी आहे. यावर्षी त्यांनी शाडुंच्या मुर्त्याबरोबर पीओपीच्या मुर्त्याही बनविल्या आहेत. राजापूर तालुक्याबरोबर मालवण, कुडाळ, कोल्हापूर या ठिकाणीही त्यांच्या मुर्त्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तांबट कुटुंबिय गणपती मुर्तीच्या अंतीम तयारीत व्यस्त झाल्याचे पाहायला मिळते.
अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची आगमनाची उत्सुकता आता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. घराघरात रंगरंगोटी, साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. तर अबाल वृध्द सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. सोशल मिडीयावरही विविध रिल्सच्या माध्यमातून यु टयुबर गणपती आणि उत्सवासंदर्भात रिल्स टाकून वातावरण निर्मिती करत आहेत त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद लाभत असल्याचे पाहायला मिळत आहे.
फोटो 11 आरजेपी 1 ते 4
राजापूर धोपेश्वर घाटी येथे चित्रशाळेत मुर्त्यावर अखेरचा हात फिरवताना मुर्तीकार निलेश रहाटे तर वरचीपेठ येथील चित्रशाळेत गणेश मूर्ती कामात व्यस्त असलेले तांबट कुटुंबिय.












