राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील ओझर गावातील रत्नाकर श्रीकांत चव्हाण या विद्यार्थ्याने कठोर परिश्रम आणि अभ्यासातील सातत्याच्या बळावर केवळ २१ व्या वर्षी प्रतिष्ठेची CMA फायनल परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. कु. रत्नाकर याने ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICMAI) मार्फत जून 2025 मध्ये झालेल्या CMA Final Group-IV परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवत Final Completed हा दर्जा प्राप्त केला.
रत्नाकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझर येथे चौथीपर्यंत झाले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे घेतले.
CMA करण्याचा ध्यास घेत रत्नाकर यांनी प्रथम इंटरमिजिएट परीक्षा आणि आता फायनल परीक्षा, दोन्हीही उच्च गुणांसह उत्तीर्ण करत आपल्या मेहनतीचा व चिकाटीचा आदर्श घालून दिला आहे.त्यांचे वडील श्री. श्रीकांत चव्हाण यांचा पारंपरिक सलून व्यवसाय असून, कुटुंबाच्या साध्या पार्श्वभूमीवरून रत्नाकर यांनी मिळवलेले हे यश गावासह जिल्ह्याचा अभिमान वाढवणारे आहे.
“कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येय निष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते,” असा संदेश रत्नाकर यांनी आपल्या यशातून दिला आहे. आता ते CMA म्हणून करिअरमध्ये पुढील पायरी गाठण्यास सज्ज झाले आहेत.












