मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान मेळावा यशस्वी

 

सावंतवाडी: राज्य विज्ञान शिक्षण संस्था, शिक्षण विभाग सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धा नुकतीच मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल येथे पार पडली. ‘क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जयप्रकाश सावंत, लक्ष्मीदास ठाकूर, रामचंद्र वालावलकर, कमलाकर ठाकूर, पांडुरंग काकतकर, ॠषिकेष गावडे, संजय शेवाळे, स्नेहा गावडे, लतिका सातार्डेकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आणि एस.पी.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्ह्याच्या शैक्षणिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांचा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. स्पर्धकांनी पॉवर पॉइंट आणि चार्ट्सच्या मदतीने आपल्या विषयाचे प्रभावी सादरीकरण केले.

स्पर्धेचा निकाल:

* प्रथम क्रमांक: अद्विता दळवी (यशवंतराव भोंसले स्कूल)

* द्वितीय क्रमांक: विभव राऊळ (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल)

* तृतीय क्रमांक: सार्थक राऊत (आरोंदा हायस्कूल)

विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले. सूत्रसंचालन लविना आल्मेडा यांनी तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष ॠषिकेष गावडे यांनी केले. प्रा. डॉ. संदीप पाटील, प्रा. प्रशांत काटे आणि प्रा. सोनाली येजरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अमिना नाईक व दिव्या परीट यांनी तांत्रिक सहकार्य केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी विज्ञान मंडळ, बी.आर.सी. स्टाफ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.